कोंडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रणाली म्हात्रे बिनविरोध
रायगड वेध अनिल पवार नागोठणे
रोहा तालुक्यातील नागोठणे जवळील ग्रुप ग्रामपंचायत कोडंगाव पंचवार्षिक निवडणूक जानेवारी २०२१ रोजी पार पडली होती. यावेळी मा. आमदार धैर्यशील पाटील यांचे समर्थक, कोंडगाव ग्रामपंचायतीचे मुख्य मार्गदर्शक मा. सरपंच विद्यमान उपसरपंच अनंत वाघ यांच्या नेतृत्वाखाली नऊच्या नऊ जागांवर दमदार विजय मिळवून विरोधकांना चांगलीच धूळ चारत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यावेळी अनंत वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत अंतर्गत तडजोडी नुसार पहिले दोन वर्षांसाठी कोंडगाव येथील विजयी महिला सदस्य कमल बुरूमकर यांची सरपंचपदी निवड करण्यात आली होती. त्याचा सरपंच पदाचा कार्यकाळ नुकताच संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या जागेसाठी ग्रामपंचायत कार्यालयात सोमवार दि. ३ जूलै रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी सरपंच पदासाठी मा.आमदार धैर्यशील पाटील समर्थक गटातील सौ. प्रणाली देवजी म्हात्रे यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा नागोठणे मंडळ अधिकारी भरत गुंड यांनी प्रणाली देवजी म्हात्रे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
कोंडगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयात संपन्न झालेल्या या सरपंच निवडणूक प्रक्रियेच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी भरत गुंड, नागोठणे तलाठी गणेश विटेकर यांच्यासह मा.आमदार धैर्यशील पाटील समर्थक,कोंडगाव मा. सरपंच विद्यमान उपसरपंच अनंत वाघ, मा.सरपंच कमल बुरूमकर, मा.सरपंच तथा सदस्य निखिल मढवी, यशवंत शीद, विठ्ठल वाघमारे, शेवंती भस्मा, रोहिणी शीद, ग्रामसेविका विद्या घरत, मा. उपसरपंच मधुकर मढवी,धर्मा भोपी,वामन मढवी, बालाराम मढवी,गणेश केदारी आदींसह ग्रामपंचायत हद्दीतील प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित सरपंच प्रणाली म्हात्रे यांच्यावर उपस्थितांकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. तर पुन्हा एकदा निडी गावाला सरपंच पद मिळाल्याने येथील ग्रामस्थ आनंदी दिसून आले. दरम्यान माझ्या सरपंचपदाच्या एक वर्षाच्या कारकिर्दीत आमचे मार्गदर्शक उपसरपंच अनंत वाघ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत हद्दीतील गावे व आदिवासी वाड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास नवनिर्वाचित सरपंच प्रणाली म्हात्रे यांनी आपल्या निवडीनंतर बोलताना व्यक्त केला.