🛑तळा येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध करावा.
🛑बळीराजा शेतकरी संघटनेचे गटविकास अधिकारी यांना निवेदन
🛑पशुधन जपण्याकडे शासनाचे दुर्लक्ष
रायगड वेध तळा प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर
तळा येथे पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध करावा यासाठी बळीराजा शेतकरी संघटने तर्फे गटविकास अधिकारी तळा यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील तळा ,सोनसडे,महागाव अशी गुरांची तीन दवाखाने असुन त्यात एकही डॉक्टर नसल्याने जनावरांचे हाल होत आहेत.सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे गुरे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध नसल्याने गुरांवर वेळीच उपचार होत नाहीत व यामुळे गाई,म्हशी,शेळ्या,इत्यादी पाळीव प्राणी मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करत असताना जनावरांच्या आजारपणात शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याचा मोठा आधार असतो.परंतु तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.या दवाखान्यात शिपाई, व कंपाऊंडर ठेवलेले आहेत परंतु गुरांवर उपचार करणारे डॉक्टर नाहीत मग हे दवाखाने ठेवलेत तरी कशाला तसेच जनावरांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर शेतकरी दुग्धव्यवसाय कसा करणार असा संतप्त सवाल देखील शेतकऱ्यांच्या वतीने विचारला जात आहे.तसेच एक आठवड्याच्या आतमध्ये तालुक्यात डॉक्टर उपलब्ध केला नाही तर बळीराजा शेतकरी संघटने तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला याप्रसंगी संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष भास्कर गोळे,तळा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर,नाशिर रहाटविलकर,राजेश गोठेकर यांसह तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.