🛑गणपती कारखान्यात मूर्तिकारांची लगबग.
मूर्ती घडविण्यात कारागीर मग्न
रायगड वेध तळा श्रीकांत नांदगावकर
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाचा गणेशोत्सव एक महिन्यांवर येऊन ठेपला असल्याने गणपती कारखान्यात मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे.तळा तालुक्यातील गणपती कारखान्यांमध्ये मूर्ती घडविण्यात कारागीर मग्न झाले आहेत. बुद्धीची देवता असलेल्या श्री गणेशाचा गणेशोत्सव कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.पाच दिवस आरती,महाप्रसाद,भजन,नाच यामुळे एकप्रकारे भक्तिमय वातावरण निर्माण होते. गणेशोत्सवासाठी नागरिक लवकरच तयारीला लागत असून जवळपास एक महिना आधीपासूनच कारखान्यात आपल्याला हवी असलेल्या गणेश मूर्तीची ऑर्डर देऊन ठेवतात.याबाबत शहरातील अनंत कला मंदिर चे मालक गणेश मानकर यांनी सांगितले की तळा शहर,तालुका तसेच तालुक्याबाहेरील काही नागरिक अगोदरच आपल्याला हवी असलेल्या मूर्तीची ऑर्डर देतात.दरवर्षी एकूण ५०० गणेश मूर्तींची ऑर्डर येत असून त्यामध्ये ५० शाडूच्या तर ४५० पीओपी च्या मूर्तींचा समावेश आहे.पेण येथून कच्चा माल आणावा लागत असून पेट्रोल डिझेल च्या वाढत्या किमतींमुळे गाडीभाड्यात तसेच मूर्त्यांच्या किमतीत देखील वाढ झाली आहे.पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळे सर्व मूर्त्यांना सुखावून बॉडी कलर मारण्यात आले आहे. तसेच दोन दिवसांतच पूर्णतः रंगकामाला सुरुवात करणार आहोत.हल्लीच्या वाढत्या महागाईत कारखाने चालवणे परवडत नसले तरी आमचा कारखाना गेली साठ वर्षे जुना असून आत्ताची आमची तिसरी पिढी आहे.त्यामुळे परवडत नसले तरी आम्ही हा वारसा पुढे चालवत आहोत.